क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारकार्याचा वसा चालविण्यासाठी, त्यांच्या विचारातला सुशिक्षित समाज निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकासासाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) स्थापना शासन निर्णय दि.०८.०८.२०१९ अन्वये (कंपनी कायदा, २०१३ अंतर्गत कलम ८ नुसार) केली आहे. या अंतर्गत लक्षीत प्रवर्गासाठी उद्देशीत कार्यक्षेत्र व विशेष घटक स्थापिले आहेत.
दि.२६.०२.२०२० च्या शासन निर्णयान्वये संस्थेचे मुख्यालय नागपूर येथे स्थलांतरित करण्यात आलेले आहे. महाज्योतीच्या लाभार्थ्यांना योजनांचा लाभ पोहचविणे सुलभ व्हावे या हेतूने महाज्योतीचे विभागीय कार्यालय औरंगाबाद, नाशिक व पुणे येथे सुरु करण्यात आलेले असून मुंबई व अमरावती येथे विभागीय कार्यालय सुरु करण्याची कार्यवाही सुरु आहे.
महाज्योती मार्फत महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात समान संधी प्राप्त व्हावी या हेतूने MPSC, UPSC, MPSC Group B & C, MPSC (MES), SSC-CGL, IBPS-PO, LIC-AAO, मिलिटरी भरती, UGC/CSIR,NET,MH/SET,MBA-CAT, TAIT, पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण, JEE/NEET/MHT-CET आदी स्पर्धात्मक परीक्षांचे प्रशिक्षण देण्यात येते. उमेदवारांना रोजगाराची संधी मिळावी या करिता कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो तसेच विविध संशोधन कार्याला प्रोत्साहन मिळावे याकरिता पीएचडी व एम. फिल करणाऱ्या उमेदवारांना अधिछात्रवृत्ती प्रदान करण्यात येते.



